औरंगाबाद- सावित्रीबाई फुले यांनी सर्व मुलींसाठी शिक्षणाचे दार उघडे करून दिले. त्यामुळे आज घरा-घरातील मुली डॉक्टर, इंजिनिअर, वकील आदी पदावर कार्यरत आहेत. परंतु दुसरीकडे अनाथ, निराधार मुलींच्या शिक्षणाचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच अनाथालय चालविणारे संस्थाचालक शिक्षण देऊ इच्छित असताना कागदपत्रांअभावी अनाथ मुलींना शिक्षणापासून वंचितच राहावे लागत आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज मुली शिक्षण घेऊन
उच्च पदावर पोेचल्या आहेत. सावित्रीबाईंनी सर्वच मुलींना शिक्षण घेण्याची संधी
उपलब्ध करून दिली आहे. असे असताना अनेक अनाथ, निराधार मुलींना
शिक्षण मिळत नाही. काही अनाथ मुलींना आई-वडिलांचे नावही माहीत नसते. त्यातच शिक्षण
घेताना त्यांना शिक्षणासाठी लागणारे कागदपत्र आणायचे कुठून असा प्रश्न मुली आणि
संस्था चालकांच्या समोर उपस्थित झाला आहे.
जात प्रमाणपत्र तसेच रहिवासी दाखला आदी कागदपत्रेही मुलींना मिळत
नसल्याने त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने या मुलींसाठी
शिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था केली तर या मुलीही शिक्षण घेऊ शकतील असे मत व्यक्त
केले जात आहे.
अनुरक्षक गृहही नाही.
१८ वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलींचे संगोपन करण्यासाठी शहरात बालगृहे
बालिकाश्रम आहेत. परंतु अनुरक्षकगृह नसल्याने १८ वर्ष वयोगटानंतर मुलींनी काय
करायचे? असाही प्रश्न निर्माण होतो.
अनाथ मुलींनाही शिक्षण मिळावे
एकीकडे सर्व मुली शिक्षण घेताना आपण पाहतो. परंतु अनाथ, बेघर मुलींना शिक्षण देण्याची इच्छा
असूनही शिक्षण देता येत नाही. त्यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचितच रहावे लागत
आहे. अनाथ मुलींसाठीही शिक्षणाची व्यवस्था करावी.
-कविता वाघ, बालिकाश्रम संचालिका